Saturday, March 17, 2007

सुटका..

६ वर्षांचा गंपू त्यच्या घराच्या एक कोप-यात अवघडून बसला होता. त्याच्या घरात आज बरीच वर्दळ सुरू होती. पोलीसही आले होते."पंचनामा", "विषप्रयोग" असले काही शब्द त्याच्या कानावर पडत होते. पण त्यांचा अर्थ कळण्याएवढा तो अजुन मोठा झाला नव्हता.....


गंपू ४ वर्षांचा असतानच त्याची आई गेली. बाबांनी वर्षभरातच नविन लग्न केलं होतं. गंपूचे बाबा म्हणजे त्या शहरामधली एक बडी असामी होते. श्रीमंत, कर्तबगार, कर्तृत्ववान माणूस.त्याच्या सावत्र आईने त्याच्या बाबांशी लग्न केलं, ते केवळ त्यांच्या पैशांच्या मोहाने, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ होती.त्यांच्या पैशावर मनसोक्त मजा मारणे हेच तिचे काम होतं.त्यामुळे त्यांची बरीच भांडणंही होत.ह्या सर्व त्रासामुळे त्याच्या बाबांना दारूचे व्यसन लागलं होतं. निद्रानाशाचा विकारही जडला होता. रात्रभर दारू पिऊन ते पहाटे कधीतरी झोपी जात.

साहजिकच त्या व्यसनांपायी गंपूचे बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते.ते त्यच्याशी दोन शब्दही धड बोलत नसत.त्याला फ़ारसे मित्रही नव्हते. त्यामुळे शाळेतून घरी आलं की गंपूला घर खायला उठायचं.नाही म्हणायला त्याची मावशी त्याच शहरात रहायची. तिला स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिचा गंपूवर फार जीव होता. तिच्याकडे जायला मात्र त्याला फार आवडायचे. ती त्यच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याचे सगळे लाड पुरवायची. गंपू तिला अनेकदा विचारायचा देखील, "मावशी, मला कायमचं तुझ्याकडे नाही रहाता येणार?"त्यावर ती काय बोलणार? नुसतं हसून ती विषय बदलायची.

त्याच्या बाबांच्या खुनाच्या आरोपावरून त्याच्या सावत्र आईला अटक झाली.काल रात्री ते दोघंही रोजच्याप्रमाणे भरपूर दारू पिऊन झोपून गेले होते. सकाळी बघितलं तेव्हा मात्र त्याचे बाबा जिवंत नव्हते.दारूतनंच विष दिलं असावं असा पोलिसांचा संशय होता.खुनाला सबळ कारणही होतं.त्याच्या बाबांनी उतरवलेल्या विम्याला नुकतंच एक वर्ष पुर्ण झालं होतं. त्यामुळे आता त्यांचा मृत्यू झाला असता, तर कायद्याप्रमाणे, ती सगळी रक्कम त्याच्या आईला मिळणार होती. त्याच्या मावशीनं ह्यापुढे त्याची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं.त्यामुळे मात्र गंपू खूष झाला होता.

त्या रात्री मावशीच्या घरी जेवताना गंपू तिला म्हटला, " मावशी, माझ्या दुस-या आईने बाबांचा मर्डर केला असं पोलिस सांगत होते. मर्डर म्हणजे काय गं? ?"

"तुला नाही कळायचं ते इतक्यात. अजुन लहान आहेस तू."

"आणि मावशी, परवा नाही का मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणत होतीस , की ते सीरियल मधे दाखवतात ते सगळं खोटं असतं म्हणून.."

"हो रे बाळा. चुकलं माझं. तशा हलकट बायका खरोखरंच असतील असं वाटलं नव्हतं मला."

" मग मी , त्या सीरियलमधल्या बाईप्रमाणे, काल बाबांच्या झोपेच्या गोळ्या त्यांच्या दारूत हळूच मिसळल्या, तशा माझ्या दुस-या आईच्या दारूत मिसळल्या, तर तीही देवाघरी जाईल? सांग ना मावशी.. मावशी? तुला काय झालं? तू एवढी घाबरली का आहेस?तुला काय होतंय? मावशी!!! मावशी!!............"

1 comment:

Anonymous said...

hey nice one...
I liked it...
keep it up..
waiting for next story