Tuesday, August 28, 2007

जाळं

मी त्या घरातलाच एक सदस्य होतो.काही दिवसांपुरवीच रहायला आलो होतो.काही दिवसातच मी त्या घराला अगदी आपलसं केलं होतं. मस्त होतं ते नविन घर! फक्त त्या घरातले बाकीचे होते ना, त्यांना मी फारसा पसंत नाहीसं वाटलं! पण ते काय, नाखुषीचा सूर लावणारच की! कारण आता त्यांच्या हालचालींवर मर्यादा येत होत्या ना! पण एकूणात मी खाऊन पिऊन सुखी होतो. पण जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसे मला अधिक अधिक संघर्ष करावा लागत होता. बाकीच्यांनी मिळून जणु काही डाव टाकला होता माझ्यावर. सतत दुर्लक्ष,सतत उपेक्षा!काही दिवसांनी तर मला शंका यायला लागली की हे माझी कटकट घालवायला मला दगाफटका तर करणार नाहित ना! पण माझ्या सुदैवाने, मी शारिरिक बळात त्यांच्यापेक्षा कितीतरी वरचढ असल्याने ते उघडउघड काही करू शकत नव्हते.

पण आता मला त्यांच्याविरूद्ध काहीतरी उपाय योजावाच लागणार होता. असं किती दिवस चालणार! कधी न कधी डाव साधतील ते! काहीतरी करून सर्वांना सापळ्यात पकडून त्यांचा काटा काढायला हवा. आणि लवकरच तशी संधी चालून आली. त्या घराचे मालक,त्यांच्या कुटुंबाबरोबर कुठेतरी बाहेरगावी जाणार होते. सामानाकडे बघून, निदान १-२ दिवस तरी येणार नाहित असं वाटलं. हीच संधी होती. ह्या दिवसात त्यांना सापळ्यात अडकवून खलास करायला हवं. नंतर पुन्हा संधी मिळणार नाही.

मी लगेच कामाला सुरवात केली. रोज रात्री ते सर्वजण बाहेर पडत. ह्याच वेळी मी त्यांच्या भोवती माझं जाळं विणायला सुरवात केली. त्यांना कळणारही नाही असं.मला त्यांना बेसावध पकडून त्यांना ठार करायचं होतं. म्हणजे मग ह्या घरात मला विरोध करणारा कोणी उरणार नाही.आधी मी त्यांच्या बाहेर पडायच्या मार्गांवर नजर ठेवू लागलो. ते मार्ग सर्वात शेवटी बंद करायचे. म्हणजे ज्या दिवशी माझा हल्ला सुरू होईल त्या दिवशी. म्हणजे मी झडप घातल्यावर त्यांना पळायला ही जागा उरता कामा नये.माझी तयारी पुर्ण होत आली. तारीख निश्चित केली.

आणि ती रात्र आली. मी दबा धरून बसलोच होतो. मला एकाची चाहूल लागली. माझा सापळा तयारच होता. त्याने त्यात फक्त पाय टाकयचा अवकाश! आणि अपेक्षेप्रमाणे मी टाकलेल्या जाळ्यात अलगद फसला. काही कळायच्या आत त्याचे हात पाय जखडले गेले.मी लगेच त्याच्याजवळ गेलो आणि त्याने काही आवाज करायच्या आतच त्याला ठार केलं. माझं पहिलं सावज! त्याचंच रक्त पिऊन मी माझा पहिला विजय साजरा केला. त्यानंतर त्याच्या देहाची मी विल्हेवाट लावली, आणि सापळा पुन्हा तयार केला. हो! उगाच कोणाला शंका यायला नको! त्यानंतर मग मी मुळीच वेळ दवडला नाही. सरळ हल्ला सुरू केला. फारच सोपं होतं काम! एकेकाला गाठायचं, त्याला ठार केलं की पुढचा! माझ्या ताकदीपुढं कोणाचाही निभाव लागेना. त्यांना पळताही येत नव्हतं. बाहेर जायच्या सर्व खिडक्या, दारं सगळे मी आधीच "सील’ करून टाकले होते. एकाच रात्रीत त्या सर्वांचा निकाल लावला. एक दोघं , जे मला नंतर लपून बसलेले सापडले, त्यांना मी उदारपणे बाहेर सोडून दिलं. हो, तेव्हढंच थोडी दया दाखवल्याचं पुण्य!

तो एक दिवस मी त्या घरात अगदी राजासारखा घालवला.अतिशय ऎषारामात. उद्या ते कुटुंब परत येईल. मग तेव्हा त्यांच्याकडेही बघून घेइन. आता कोण अडवणार मला! स्वत:च्याच धुंदीत होतो.

दुस-या दिवशी ते तिघंही आले परत.दार उघडून ते आत आले. आत आल्यावर त्यांनी घरभर नजर फिरवली. त्या काळरात्रीच्या खुणा अजुन शिल्लक होत्या. त्यांच्याकडे आश्चर्याने बघत, ती बाई म्हटली
," ईईई काय गं बाई! २ दिवसात ही एवढी कोळ्याची जाळी कशी काय झाली? छे बाई. थांबा हं. मी आता साफ करते!! "
असं म्हणत तिने कुंचा उचलला आणि त्याच्या एकेका फटका-यानिशी माझी २ दिवसांची मेहनत ती कच-यात घालायला लगली. मी तरी काय करू शकणार! तेव्हढ्यात मी तिच्या नजरेत आलो, आणि एक फटका-यानिशी मीही खिडकीतून बाहेर फेकला गेलो!छे! आता पुन्हा नविन घर शोधा, पुन्हा नविन दुश्मन, पुन्हा नविन युद्ध! देवा, मला ह्या जन्मात कोळी बनवलंस, पण पुढचा जन्म माणसाचा दे रे बाबा!