Saturday, March 17, 2007

पुनर्भेट

"A criminal always returns to the scene of crime." ही शेवटची ओळ वाचून मी ते पुस्तक मिटलं. किती मूर्ख कल्पना!! असा कोण गुन्हेगार असेल जो स्वतःहून परत गुन्ह्याच्या जागेला भेट देईल आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल? त्या लेखकाच्या मते गुन्हेगाराला कायम 'आपण काही पुरावा मागे तर सोडल नाही ना?' ह्या भीतीने त्या जागेला भेट देतो, तो पुरावा नष्ट करण्यासाठी. नक्कीच अतिशय मूर्ख गुन्हेगार असला पाहिजे तो! जर नीट प्लॅन करून गुन्हा केला तर पुरावा मागे राहिलच कशाला?आता माझंच उदाहरण घ्या ना!

मी आहे ह्या शहरामधला एक कुप्रसिद्ध contract killer.माझे काम अतिशय झटपट असे, व मी कुठलाही पुरावा मागे सोडत नसे. त्यामुळे माझे "clients" माझ्यावर अतिशय खूष असत.जेव्हा माझ्यासरखे सुशिक्षित बेकार तरूण नाईलाजापोटी हा पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग अनुसरतात, तेव्हा त्या गुन्ह्यामागची भयानकता कैक पटीने वाढते.मी माझ्या सावजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करत असे. अगदी त्याच्या खाण्यपिण्याच्या सवईपासून, ते त्याच्या पगार किती आहे, त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत इत्यादी सर्व माहिती मी जमवत असे.त्यावरून मग मी त्याला संपवण्याची एक योजना बनवत असे. त्या योजनेच्या प्रत्येक पायरीला मी safety valves ठेवीत असे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही काही चूक होती आहे असं वाटलं तर मी तिथून सुरक्षितपणे निसटू शकत असे.माझी योजना केवळ खून करून संपत नसे. त्या खूनाशी संबंधित कुठलाही पुरावा पोलिसांना सापडणार नाही ह्याचा पुरेपूर बंदोबस्त करूनच मी माझे काम संपवत असे. त्यामुळेच माझ्या कित्येक सावजांची प्रेतंही अजुन पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळे मला परत गुन्ह्याच्या जागेला परत भेट द्यायची कधी आवश्यकताच नसायची.....

त्या दिवशी दुपारी मी असाच एक "काम" संपवून एका बंगल्यातनं बाहेर पडलो. मी शक्यतो माझी कामं सकाळच्या वेळीच संपवत असे. कारण माझा अनुभव होता की सकाळच्या वेळी काम संपवून मग गर्दीमधे मिसळून जाणं रात्रीपेक्षा जास्ती सोपं आणि सोयीस्कर असतं. शिवाय माझं सावज एक गृहिणी होती, आणि त्या दुपारीच घरी एकट्या सापडतात.दुस-या दिवशी मी वर्तमानपत्रात त्या खूनाविषयी काही बातमी आली आहे का ते बघत होतो. पहिल्याच पानावर बातमी होती. मी बातमी वाचू लागलो. त्यातला एक परिच्छेद वाचून मात्र मी हादरलो.

"ह्या खूनाचा तपास करणारे अधिकारी ईन्स्पेक्टर प्रताप गोखले ह्यांनी पत्रकारांना सांगितले की ह्या खून पहाणारा एक eyewitness पोलिसांना मिळाला आहे. त्यांचं नाव आहे श्री.आपटे. त्यांचा त्याच रस्त्यावर बंगला आहे.त्या दिवशी दुपारी श्री. आपटे त्यांच्या बंगल्याच्या गॅलरीत बसले असतानाच त्यांना समोरच्या बंगल्याच्या खिडकीतून खून होताना दिसला. त्यांनी खुन्याचं वर्णनही पोलिसांना सांगितलं आहे. त्यावरून खुन्याचे छायाचित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला खात्री आहे की आम्ही त्या खुन्याला लवकरच अटक करू..... इ.इ...."

अरे बाप रे! मी खून करताना खिडकी बंद करायची विसरूनच गेलो होतो!पण तरीही एक गोष्ट माझ्या बाजूची होती. त्या मूर्ख अधिका-याने त्या eyewitness ची माहिती उघडपणे पत्रकारांना सांगून टाकली होती. आता फक्त त्याला शोधून खतम केला की मग मी पुन्हा निर्धास्त होऊ शकत होतो. मी तो खुनाचा प्रसंग आठवू लागलो. विशेषतः त्या खिडकीतून दिसणारा बाहेरचा देखावा.समोर कोणकोणते बंगले होते, व त्यापैकी किती बंगल्यांच्या गॅलरीतून ती खिडकी दिसू शकत होती हे मी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला.माझ्या डोळ्यासमोर दोन-तीन बंगले आले ज्यांच्या बाबतीत हे शक्य होतं. आता फक्त त्याच्यात्ला आपट्यांचा बंगला कोणता हे शोधून त्यांना संपवलं की झालं. हे काम लगेच उरकायला हवं होतं. कारण एकदा का माझं छायाचित्र तयार झालं की माझी कंबक्तीच!त्याच रात्री मी परत त्या रस्त्यावर गेलो. आपट्यांचा बंगला सापडणं काही फार कठीण गेलं नाही. वरती एकाच खोलीत दिवा जळतना दिसत होता. माझं नशीब जोरावर होतं.आपटे एकटेच घरात होते बहुतेक. मी सवयीनुसार माझ्याकडच्या master key ने दरवाजा उघडला. आत काळोखच होता. दोन तीन पावलं पुढे गेलो असेल नसेल, तोच अचानक दिवे लागले आणि माझ्या पाठीमागुन आवाज आला "हॅण्ड्स अप!" मला सर्व डाव एका क्षणात समजला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता........

आज इथे, जेलमधे बसून मी विचार करत होतो, की मी नक्के का पकडला गेलो? कुठे चूक झाली?आणि एकदम मला उत्तर मिळालं, मी माझ्या मनातल्या मनात का होईना, परत त्या खुनाच्या जागेला भेट दिली होती, आणि तिथेच फसलो!! खरंच , 'A criminal always returns to the scene of crime!!!!"
भविष्य

गिरीश रानडे हा एक सर्वसामान्य उच्चशीक्षित तरूण होता. लग्न,संसार सारं काही सुरळीत सुरू होतं.एकंदरीत सुखवस्तू म्हणतात तसला गृहस्थ. एकच समस्या होती. त्याचा ज्योतीषावर जरा जास्त विश्वास होता. हे त्याच्या बायकोला अजिबात आवडायचं नाही. ती त्याला सारखं म्हणायची, हे तुझं ज्योतीषच एक दिवशी आपला घात करेल.पण तिचं भविष्य एवढ्या भयानक रितीने खरे ठरेल असं त्याल स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं........

त्या दिवशी गिरीष जरा लवकर कामावर निघाला होता.जाताना वाटेत, त्याला त्याच्या गाडीतून, कोप-यावर एक ज्योतिषी बसलेला दिसला.लगेच त्याला वाटलं, चला बघुया तर खरं काय लिहीलंय आपल्या भाग्यात आज! लगेच स्वारीने गाडी तिकडे वळवली.ज्योतिषाने जे भविष्य सांगितलं ते ऎकून मात्र गिरीष हादरला.त्याला क्षणभर काही सुचेनाच. जरा भानावर आल्यावर त्याने विचार केला," जर हे भविष्य मला खोटं ठरवायचं असेल, तर मला आज कोणाशीही भेटून चालणार नाही. आजचा दिवस अगदी एकट्याने घालवायला हवा." त्याने लगेच बायकोला फोन करून सांगितलं," मला आज तातडीचं काम निघालं आहे, त्यासाठी बाहेरगावी जावं लागेल. मी उद्या सकाळी परत येईन." त्याने तडक गाडी मागे वळवली, आणि शहरातलं एका चांगल्याशा हॉटेलात गेला. तिथे एका दिवसापुरती खोली भाड्याने घेतली. उरलेला संपूर्ण दिवस त्याने खोलीवरच काढला. जेवणही तिथेच मागवलं. त्या रात्री,ते भविष्य आपण टाळलं असा विचार करत तो शांतपणे झोपला. पण नियती थोडीच झोपी जाते? तिचे पडद्यामागचे खेळ सुरूच असतात...

दुस-या दिवशी सकाळी गिरीष उठला. प्रातर्विधी उरकून त्याने वेटर्ने सकाळेच बाहेर आणून ठेवलेला पेपर उचलला.पहिल्या पानावरची ती बातमी पाहून तो हादरलाच!

"नामवंत सर्जन डॉ. गिरीष रानडे ह्यांच्या पत्नीचे अपघाती निधन"
काल दुपारी, नामवंत सर्जन डॉ.गिईष रानडे ह्यांच्या पत्नी, सौ.प्रमिला रानडे, बाजारःआत करून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला एका भरदाव ट्रकने धडक मारली.सौ.रानडे जागीच बेशुद्ध झाल्या. जमावाने त्यांना जवळच्याच हॉस्पीटलमधे भरती केलं. योगायोग म्हणजे ते हॉस्पीटल त्यांचे यजमान डॉ.गिरीष रानडे यांचच होतं.पण हॉस्पीटल मधल्या स्टाफने सांगितलं की आज डॉक्टर हॉस्पीटल मधे आलेच नाहीत, व त्यांचाही मोबाईलही बंद होता .सौ. रानडेंचं तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं असल्यामुळे त्यांना नाईलाजाने दुस-या होस्पीटलमधे भरती करण्यास न्यावं लागलं. दुर्दैवाने वाटेत ambulance ट्रॅफिक जॅम मधे अडकल्याने दुस-या हॉस्पीटलला पोचायच्या आतंच त्यांचं निधन झालं. त्यानंतर अजुनही डॉक्टरांशी संपर्क होऊ शकलेला नाही.....
भोवळ येऊन पडण्यापुर्वी गिरीषला ज्योतिषाचं भविष्य आठवत होतं, " आज तुमच्या चुकीमुळे अथवा निष्काळजीपणाने, तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जिवाला धोका पोचू शकेल..............."


सुटका..

६ वर्षांचा गंपू त्यच्या घराच्या एक कोप-यात अवघडून बसला होता. त्याच्या घरात आज बरीच वर्दळ सुरू होती. पोलीसही आले होते."पंचनामा", "विषप्रयोग" असले काही शब्द त्याच्या कानावर पडत होते. पण त्यांचा अर्थ कळण्याएवढा तो अजुन मोठा झाला नव्हता.....


गंपू ४ वर्षांचा असतानच त्याची आई गेली. बाबांनी वर्षभरातच नविन लग्न केलं होतं. गंपूचे बाबा म्हणजे त्या शहरामधली एक बडी असामी होते. श्रीमंत, कर्तबगार, कर्तृत्ववान माणूस.त्याच्या सावत्र आईने त्याच्या बाबांशी लग्न केलं, ते केवळ त्यांच्या पैशांच्या मोहाने, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ होती.त्यांच्या पैशावर मनसोक्त मजा मारणे हेच तिचे काम होतं.त्यामुळे त्यांची बरीच भांडणंही होत.ह्या सर्व त्रासामुळे त्याच्या बाबांना दारूचे व्यसन लागलं होतं. निद्रानाशाचा विकारही जडला होता. रात्रभर दारू पिऊन ते पहाटे कधीतरी झोपी जात.

साहजिकच त्या व्यसनांपायी गंपूचे बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते.ते त्यच्याशी दोन शब्दही धड बोलत नसत.त्याला फ़ारसे मित्रही नव्हते. त्यामुळे शाळेतून घरी आलं की गंपूला घर खायला उठायचं.नाही म्हणायला त्याची मावशी त्याच शहरात रहायची. तिला स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिचा गंपूवर फार जीव होता. तिच्याकडे जायला मात्र त्याला फार आवडायचे. ती त्यच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याचे सगळे लाड पुरवायची. गंपू तिला अनेकदा विचारायचा देखील, "मावशी, मला कायमचं तुझ्याकडे नाही रहाता येणार?"त्यावर ती काय बोलणार? नुसतं हसून ती विषय बदलायची.

त्याच्या बाबांच्या खुनाच्या आरोपावरून त्याच्या सावत्र आईला अटक झाली.काल रात्री ते दोघंही रोजच्याप्रमाणे भरपूर दारू पिऊन झोपून गेले होते. सकाळी बघितलं तेव्हा मात्र त्याचे बाबा जिवंत नव्हते.दारूतनंच विष दिलं असावं असा पोलिसांचा संशय होता.खुनाला सबळ कारणही होतं.त्याच्या बाबांनी उतरवलेल्या विम्याला नुकतंच एक वर्ष पुर्ण झालं होतं. त्यामुळे आता त्यांचा मृत्यू झाला असता, तर कायद्याप्रमाणे, ती सगळी रक्कम त्याच्या आईला मिळणार होती. त्याच्या मावशीनं ह्यापुढे त्याची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं.त्यामुळे मात्र गंपू खूष झाला होता.

त्या रात्री मावशीच्या घरी जेवताना गंपू तिला म्हटला, " मावशी, माझ्या दुस-या आईने बाबांचा मर्डर केला असं पोलिस सांगत होते. मर्डर म्हणजे काय गं? ?"

"तुला नाही कळायचं ते इतक्यात. अजुन लहान आहेस तू."

"आणि मावशी, परवा नाही का मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणत होतीस , की ते सीरियल मधे दाखवतात ते सगळं खोटं असतं म्हणून.."

"हो रे बाळा. चुकलं माझं. तशा हलकट बायका खरोखरंच असतील असं वाटलं नव्हतं मला."

" मग मी , त्या सीरियलमधल्या बाईप्रमाणे, काल बाबांच्या झोपेच्या गोळ्या त्यांच्या दारूत हळूच मिसळल्या, तशा माझ्या दुस-या आईच्या दारूत मिसळल्या, तर तीही देवाघरी जाईल? सांग ना मावशी.. मावशी? तुला काय झालं? तू एवढी घाबरली का आहेस?तुला काय होतंय? मावशी!!! मावशी!!............"