Thursday, April 19, 2007

संशय

मुग्धा अतिशय अस्वस्थ मनाने घरातल्या घरात फे-या मारत होती.तिचे गेला आठवडा अतिशय बेचैनीत गेला होता.तिचा नवरा गिरीष, ह्याचे दुस-या कोणा बाईबरोबर संबंध आहेत अशी कुणकुण तिला लागली होती, आणि ह्याची खात्री कशी करून घेता येईल, ह्याचाच विचार ती करत होती.....

मुग्धा आणि गिरीषचा प्रेमविवाह होता.गिरीषच्या दृष्टीने बोलायचं झालं, तर मुग्धासारख्या श्रीमंत मुलीला गटवणे, हे त्याचे आयुष्यातलं एकमेव कर्तृत्व होतं,आणि तो सध्ध्या त्याच्या सास-याच्या कंपनीत, त्याच्याच कृपेने मिळालेल्या एका बड्या पदावर कामाला होता.फुकट मिळालेल्या वस्तूची जशी आपल्याला किंमत नसते, तसंच गिरीषला त्याच्या नव्या पदाच्या जबाबदा-यांशी काहीही देणंघेणं नव्हतं. मनाला मानेल तेव्हा कंपनीत यावं, मनसोक्त गप्पा हाणाव्यात, अगदी किरकोळ काम जमलच तर करावं, आणि संध्याकाळी ५च्या ठोक्याला कंपनीतून बाहेर पडून, नंतर एखाद्या बारमधे बसून नंतर मग आरमात घरी यावं, असा त्याचा रोजचा भरगच्च कार्यक्रम असे. त्याच्या सास-यांनी त्याची अनेकदा कानउघडणी करूनही त्याच्यात काहीही फरक नव्हता.

त्याचं ऑफिसातलं हे वागणं, त्याचा एक प्रतिस्पर्धी रमेशला अजिबात पटायचं नाही. रमेश हा अतिशय मेहनतीने, स्वकर्तृत्वावर त्याच्या पदापर्यंत येऊन पोचला होता. त्याने अनेकदा गिरीषबद्दल वरिष्ठांकडे तक्रार केली होती, पण मालकाचाच जावई असल्यामुळे तेही काही करायला धजावले नव्हते. हे गिरीषला कळल्यामुळे त्याचा रमेशवर राग होता. तो सतत रमेशला पाण्यात पहायचा.

रमेशनीच मुग्धाला फोन करून गिरीष्च्या प्रकरणाबद्दल माहिती सांगितली होती.त्यानी गिरीषला एका तरूणीबरोबर थेटरात जाताना पाहिले होते, आणि लगेच ही खबर त्याने मुग्धाला सांगितली होती. मुग्धानी त्याच दिवशी गिरीषला त्याच्या ऑफिसातल्या मित्रमैत्रिणींबद्दल जरा खोदून खोदून चौकशी केली होती, पण गिरीषने तिला कशाचाही थांगपत्ता लागू दिला नव्हता.

पण आज तिच्याकडे खात्री करून घ्यायची एक संधी अचानक आली होती.गिरीष एका conference साठी लोणावळ्याला जाणार होता.तिला रमेशनी फोन करून सांगितलं होतं, की गिरीषनी त्या तरूणीला पण तिकडे बोलावून घेतलं आहे, व त्यांचा तिकडे मनसोक्त मजा मारायचा बेत आहे. त्यामुळे त्या दिवशी गिरीषच्या मागोमाग मुग्धाही दुस-या गाडीत बसून त्याचा पाठलाग करू लागली. मधेच अचानक त्याची गाडी कुठे गायब झाली ते मुग्धाला समजलच नाही. पण सुदैवाने तिला conferenceजिथे होणार होती त्या हॉटेलचा पत्ता ठाऊक होता. गिरीषची गाडी सापडेना, तशी मुग्धा सरळ त्या हॉटेलवरच जायला निघाली.

मुग्धाला त्या हॉटेलवर पोचायला जवळ जवळ तीन तास लागले.कारण तिच्या गाडीचे ब्रेक मधेच फेल झाल्यामुळे, तिला तासभर मेकॅनीककडे रखडावं लागलं होतं.हॉटेलवर पोचल्यावर तिने लगेचच गिरीषची गाडी सापडली. ती तडक त्याच्या खोलीकडे निघाली. त्याच्या खोलीचं दार धाडदिशी उघडून ती आत शिरली...

पण आत गिरीष एकटाच होता. तो तिला बघून एकदम आश्चर्यचकित झाला. तिने मग काहीतरी थातूरमातूर कारण सांगून वेळ मारून नेली.मात्र मनातल्या मनात मात्र ती खूप आनंदीत झाली होती. तिच्या मनावरचं एक ओझं उतरलं होतं.

त्यानंतर दुस-या दिवशीच पोलिस त्यांच्या दारावर आले. एका तरूणीचा खून झाला होता, आणि तिच्या घरात गिरीषचा फोटो सापडला होता. हे ऎकून मुग्धा भोवळ येऊन पडायच्या बेतात आली होती.तेवढ्यात पोलिस म्हटले," तुम्ही कोणा रमेशला ओळखता का? त्या तरूणीच्या घरात एक चिट्ठी सापडली आहे. रमेश नावाच्या माणसाने लिहीलेली. त्यात असं म्हटलं आहे की ह्या तरूणीने गिरीषला आपल्या जाळ्यात ओढलं तर तिला हा रमेश दहा हजार रुपये देईल."....

पोलिस निघून गेल्यावर मुग्धा स्फुंदत स्फुंदत गिरीषला म्हणाली," ह्या रमेशनीच मला तुझ्या विरूद्ध, खोट्यानाट्या बातम्या सांगितल्या. माझ्या मनात तुझ्याविषयी संशय निर्माण केला. मे चुकले. पण आता मात्र मे कधीच तुझ्यावर असा संशय घेणार नाही."

गिरीषने प्रेमाने तिल मिठीत घेतलं.मुग्धाच्या गाडीतले ब्रेक्स अगोदरच फेल करून ठेवण्याच्या, तेवढ्या वेळात आपल्या त्या प्रेयसीचा, हाताचे कुठेही ठसे न उमटू देता खून करण्याच्या व नंतर अतिशय वेगाने गाडी चालवून तिच्या आधी लोणावळ्याला पोचण्याच्या, स्वत:च लिहीलेली रमेशच्या हस्ताक्षरातली चिट्ठी व स्वतःचा फोटो तिच्या घरात ठवण्याच्या, ह्या सगळ्या गिरीषने घेतलेल्या श्रमांचे आत्ता सार्थक झालं होतं. रमेश विरुद्ध प्रत्यक्ष पुरावा काही नसल्यामुळे तो कदाचित निर्दोष सुटेलही, पण त्याचे आयुष्य मात्र बरबाद झालं होतं. ह्या विचाराने, तिला मिठीत घेतल्यावर त्याच्या चेह-यावर उमटलेलं क्रूर स्मित तिला दिसणं शक्यच नव्हतं.......
3 comments:

अनु said...

Solid!!

TheKing said...

Good to have found this blog.
Nice stories!

॥पांनलोक॥ said...

कथा आवडली.