Saturday, March 17, 2007

पुनर्भेट

"A criminal always returns to the scene of crime." ही शेवटची ओळ वाचून मी ते पुस्तक मिटलं. किती मूर्ख कल्पना!! असा कोण गुन्हेगार असेल जो स्वतःहून परत गुन्ह्याच्या जागेला भेट देईल आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल? त्या लेखकाच्या मते गुन्हेगाराला कायम 'आपण काही पुरावा मागे तर सोडल नाही ना?' ह्या भीतीने त्या जागेला भेट देतो, तो पुरावा नष्ट करण्यासाठी. नक्कीच अतिशय मूर्ख गुन्हेगार असला पाहिजे तो! जर नीट प्लॅन करून गुन्हा केला तर पुरावा मागे राहिलच कशाला?आता माझंच उदाहरण घ्या ना!

मी आहे ह्या शहरामधला एक कुप्रसिद्ध contract killer.माझे काम अतिशय झटपट असे, व मी कुठलाही पुरावा मागे सोडत नसे. त्यामुळे माझे "clients" माझ्यावर अतिशय खूष असत.जेव्हा माझ्यासरखे सुशिक्षित बेकार तरूण नाईलाजापोटी हा पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग अनुसरतात, तेव्हा त्या गुन्ह्यामागची भयानकता कैक पटीने वाढते.मी माझ्या सावजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करत असे. अगदी त्याच्या खाण्यपिण्याच्या सवईपासून, ते त्याच्या पगार किती आहे, त्याचे मित्रमैत्रिणी कोण आहेत इत्यादी सर्व माहिती मी जमवत असे.त्यावरून मग मी त्याला संपवण्याची एक योजना बनवत असे. त्या योजनेच्या प्रत्येक पायरीला मी safety valves ठेवीत असे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही काही चूक होती आहे असं वाटलं तर मी तिथून सुरक्षितपणे निसटू शकत असे.माझी योजना केवळ खून करून संपत नसे. त्या खूनाशी संबंधित कुठलाही पुरावा पोलिसांना सापडणार नाही ह्याचा पुरेपूर बंदोबस्त करूनच मी माझे काम संपवत असे. त्यामुळेच माझ्या कित्येक सावजांची प्रेतंही अजुन पोलिसांना सापडलेली नाहीत. त्यामुळे मला परत गुन्ह्याच्या जागेला परत भेट द्यायची कधी आवश्यकताच नसायची.....

त्या दिवशी दुपारी मी असाच एक "काम" संपवून एका बंगल्यातनं बाहेर पडलो. मी शक्यतो माझी कामं सकाळच्या वेळीच संपवत असे. कारण माझा अनुभव होता की सकाळच्या वेळी काम संपवून मग गर्दीमधे मिसळून जाणं रात्रीपेक्षा जास्ती सोपं आणि सोयीस्कर असतं. शिवाय माझं सावज एक गृहिणी होती, आणि त्या दुपारीच घरी एकट्या सापडतात.दुस-या दिवशी मी वर्तमानपत्रात त्या खूनाविषयी काही बातमी आली आहे का ते बघत होतो. पहिल्याच पानावर बातमी होती. मी बातमी वाचू लागलो. त्यातला एक परिच्छेद वाचून मात्र मी हादरलो.

"ह्या खूनाचा तपास करणारे अधिकारी ईन्स्पेक्टर प्रताप गोखले ह्यांनी पत्रकारांना सांगितले की ह्या खून पहाणारा एक eyewitness पोलिसांना मिळाला आहे. त्यांचं नाव आहे श्री.आपटे. त्यांचा त्याच रस्त्यावर बंगला आहे.त्या दिवशी दुपारी श्री. आपटे त्यांच्या बंगल्याच्या गॅलरीत बसले असतानाच त्यांना समोरच्या बंगल्याच्या खिडकीतून खून होताना दिसला. त्यांनी खुन्याचं वर्णनही पोलिसांना सांगितलं आहे. त्यावरून खुन्याचे छायाचित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला खात्री आहे की आम्ही त्या खुन्याला लवकरच अटक करू..... इ.इ...."

अरे बाप रे! मी खून करताना खिडकी बंद करायची विसरूनच गेलो होतो!पण तरीही एक गोष्ट माझ्या बाजूची होती. त्या मूर्ख अधिका-याने त्या eyewitness ची माहिती उघडपणे पत्रकारांना सांगून टाकली होती. आता फक्त त्याला शोधून खतम केला की मग मी पुन्हा निर्धास्त होऊ शकत होतो. मी तो खुनाचा प्रसंग आठवू लागलो. विशेषतः त्या खिडकीतून दिसणारा बाहेरचा देखावा.समोर कोणकोणते बंगले होते, व त्यापैकी किती बंगल्यांच्या गॅलरीतून ती खिडकी दिसू शकत होती हे मी डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला.माझ्या डोळ्यासमोर दोन-तीन बंगले आले ज्यांच्या बाबतीत हे शक्य होतं. आता फक्त त्याच्यात्ला आपट्यांचा बंगला कोणता हे शोधून त्यांना संपवलं की झालं. हे काम लगेच उरकायला हवं होतं. कारण एकदा का माझं छायाचित्र तयार झालं की माझी कंबक्तीच!



त्याच रात्री मी परत त्या रस्त्यावर गेलो. आपट्यांचा बंगला सापडणं काही फार कठीण गेलं नाही. वरती एकाच खोलीत दिवा जळतना दिसत होता. माझं नशीब जोरावर होतं.आपटे एकटेच घरात होते बहुतेक. मी सवयीनुसार माझ्याकडच्या master key ने दरवाजा उघडला. आत काळोखच होता. दोन तीन पावलं पुढे गेलो असेल नसेल, तोच अचानक दिवे लागले आणि माझ्या पाठीमागुन आवाज आला "हॅण्ड्स अप!" मला सर्व डाव एका क्षणात समजला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता........

आज इथे, जेलमधे बसून मी विचार करत होतो, की मी नक्के का पकडला गेलो? कुठे चूक झाली?आणि एकदम मला उत्तर मिळालं, मी माझ्या मनातल्या मनात का होईना, परत त्या खुनाच्या जागेला भेट दिली होती, आणि तिथेच फसलो!! खरंच , 'A criminal always returns to the scene of crime!!!!"




5 comments:

Unknown said...

khoop chaan aahe

C0Manche said...

Arey Chapya Tu crime scene war nahi gelas tu crime jithe zala tya gharyachya samor hotas.
Ani ya rahasyakathene he siddha hoth nahi ki "THIEF ALWAYS RETURN TO CRIMINAL SITE" pun he siddh hote ki "KANUN KE HATH BAHOT LAMBE HOTE HAIN".

Prasad Chaphekar said...

मी ह्या कथेतनं हेच सांगायचा प्रयत्न केला की जेव्हा तो गुन्हेगार त्याला खूनाच्या खोलीतून दिसलेलं खुनाचं द्रुश्य डोळ्यासमोर आणतो, तेव्हा तो त्याच्या मनातल्या मनात त्या जागेला भेट देतो. so, he does indeed return to the crime scene IN HIS MIND!

HAREKRISHNAJI said...

वा

प्रमोद देव said...

प्रसाद तुझ्या चारही अनुदिन्यांवरील लेखन वाचले. तुझ्या लिखाणात एक सच्चेपणा आणि ताजेपणा आढळतो. तसेच शिरीष कणेकरांची ती तिरकस विनोद बुध्दीही तुझ्या लिखाणात छानपणे डोकावते. असाच लिहित राहिलास तर एक दिवस शिरीष कणेकरांच्या वरताण होशील ह्या बद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाहीये. तुझ्या भावी लेखनाबद्दल मन:पूर्वक शुभेच्छा!
प्रमोद देव